६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत

 [This article appeared in BMM NewsLetter of June 2019]

६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत

सागर साबडे
सचिव,
लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ


१५ एप्रिल २०१९ ला झालेल्या बोस्टन मॅरेथॉन मध्ये लॉस एंजेलिस येथील रहिवासी श्री. सतीश  कोल्ढेकर (६६ वर्षे) यांनी सहभाग घेतला व जगातील ६ प्रसिद्ध मॅरेथॉन (बर्लिन , टोकियो, लंडन, न्यूयॉर्क, बोस्टनआणि शिकागो) पूर्ण करायचा विक्रम केला. या वयात ६ मॅरेथॉन पूर्ण केलेले अमेरिकास्थित ते पहिले* मराठी भाषिक!.  मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे तब्बल २६.२ मैल अंतर पळायचे!  हि एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक कसोटीच असते.  ६६ व्या वर्षी एवढे चिकाटीने पळणे, असा विक्रम करणे निश्चितच कौतुकास्पद आहे. माधव ज्युलियन यांच्या कवितेप्रमाणे "धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे" असं जरी असलं तरी पळण्याच्या बाबतीत अस्मादिकांचे पळपुटीचे धोरण असल्याने एवढा पळणारा हा माणूस नक्की काय खातो आणि त्याला एवढा वेळ कधी मिळतो याबद्दल मला कुतुहूल होते. म्हणून त्यांची मी एक छोटी मुलाखत घेतली.  त्याचा सारांश बीएमएमच्या वाचकांसाठी. त्यातून कुणाला पळण्याची प्रेरणा मिळाली तरी त्यांच्या या प्रयत्नांचं सार्थक होईल!

१. तुमच्या विषयी थोडक्यात सांगा.
मूळचे आम्ही रत्नागिरीतील कोलढे गावचे, पण आमच्या ३ पिढ्या गुजराथ मध्ये स्थायिक झाल्या. माझा जन्म वडोदरा (गुजराथ) चाच. मी अमेरिकेत शिकायला आलो आणि १९८० साली मी ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९२ पासून मी माझा स्वतःचा श्रवणयंत्राचा व्यवसाय सांभाळतो आहे.माझी पत्नी, सपना,  बालरोग चिकित्सक आहे. 

२. तुम्ही पळायला सुरुवात कधी केली?
२००१ मध्ये माझी पत्नी लॉस एंजेलिस मॅरेथॉन मध्ये भाग घेत होती आणि तिला सोबत म्हणून मी  पळायला सुरुवात केली. तेंव्हा मला पण पळायची गोडी लागली आणि २००१ मध्ये आम्ही दोघांनी पहिल्यांदा मॅरेथॉन पूर्ण केली. त्यानंतर २००९ पर्यंत दरवर्षी मी लॉस एंजेलिस मॅरेथॉन मध्ये भाग घेतला.  २०१३ मध्ये मला प्रचंड आर्थिक फटका बसल्याने मानसिक तणाव वाढलाहोता  पण पळण्यामुळे व नियमित व्यायामामुळे त्याचे नियंत्रण शक्य झाले.

३. तुम्ही या ६ स्पर्धा पळायचे ठरवले होते का?
अजिबात नाही! २०१४ मध्ये मी व माझ्या मुलीने शिकागो मॅरेथॉन पूर्ण केली. त्यानंतर जगातील ६ स्पर्धा पूर्ण कराव्यात असं तिनं सुचवलं. त्या निमित्ताने नवीन गावांना/देशांना भेट देता येईल म्हणून आणि एक वैयक्तिक उद्दीष्ट म्हणून मला ती सूचना आवडली.

सतीश यांच्या ६ मॅरेथॉनचे निकाल (वर्षानुसार).
image.png


४. स्पर्धेसाठी काय तयारी केली आणि काय अडथळे होते?
सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. मला रोज लवकर उठून पळण्याची तयारी करावी लागली. तसेच मित्रपरिवाराबरोबर होणारी उठबस (socialization) कमी करावी लागली. विशेषतः दर रविवारी १२ ते २० मैल पळण्याचा सराव करीत असल्याने शनिवारी पुरेशी झोप घेणे आवश्यक होते. मला अनेकांनी एवढे पळणे शरीरासाठी हानिकारक आहे असा सल्ला दिला. पळण्याने गुढग्यावर दाब येऊन ते लवकर निकामी होतात असेही काहीजणांनी सांगितले. मी अभ्यास केल्यावर त्यात फारसे तथ्य नसल्याचे माझ्या लक्षात आले. पळण्यापूर्वी व नंतर पुरेसे "स्ट्रेचिंग" चे व्यायाम केल्याने मला कोणतीही दुखापत झाली नाही. पळण्याने वजन आटोक्यात राहते, गुढग्याचा संधिवात व मधुमेह होण्याची शक्यता कमी होते हे अतिरिक्त फायदे.  (संदर्भ: https://www.webmd.com/fitness-exercise/features/fitness-basics-running-for-your-life)

५. पळण्याची प्रेरणा कशी मिळाली?
माझी आई शाळेत शिक्षिका असल्याने सर्व क्रीडाप्रकारात तिचा सहभाग असायचा. कदाचित तेंव्हा झालेले संस्कार मला अजून प्रेरणा देत असावेत. अर्थात माझ्या पत्नीने मला वेळोवेळी प्रेरणा आणि आधार दिला. शिवाय माझा स्वभाव थोडा एकलकोंडा (introvert) असल्याने पळण्याच्या क्रीडाप्रकाराने मला स्वाभाविकपणे आकृष्ट केले.

६. प्रत्यक्ष मॅरेथॉन साठी कोणी मार्गदर्शक होते का?
आजपर्यंत मी १७ मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आहे.  माझ्या पहिल्या ११ मॅरेथॉन मध्ये मी Hal Higdon यांचा ३० आठवड्याचा ट्रेनिंग प्रोग्रॅम वापरला. (https://www.halhigdon.com/training-programs/marathon-training/personal-best/) न्यूयॉर्क (२०१६) व लंडन (२०१७) मॅरेथॉनसाठी मी एका मेक्सिकन कोचची मदत घेतली.  त्यानंतर मी मिशिगन मधील Hanson Running Club मध्ये नाव नोंदले व तेथील Mike Morgan ह्यांनी मला टोकियो (२०१८) व बोस्टन (२०१९),  सॉल्ट लेक सिटी ((२०१८) व सॅक्रमेंटो (२०१८) या मॅरॅथॉनसाठी मला मार्गदर्शन केले.

७. तुम्ही काही विशिष्ठ आहार घेता का? त्यात काही बदल केले का?
मी रोज १०० ग्रॅम प्रथिने घेतो.  बरेच वर्षे मी शाकाहारी होतो पण अधिक प्रथिने मिळवण्यासाठो मी रावस (salmon) मासे खायला सुरुवात केली. त्यात कमी वजनात सर्वात जास्त प्रथिने असतात.  अंड्यातील पिवळा बलक काढून केलेले ऑम्लेट खाल्ले. शिवाय रोज ९ तास व्यवस्थित विश्रांती घेतली.  मॅरेथॉन पळण्यासाठी नियमितता आणि विश्रांती दोन्ही आवश्यक आहे.

८. तुम्ही रोज किती पळायचा? यासाठी तुम्हाला वेळ कसा मिळतो?
मी आठवड्यातून ५ दिवस पाळणे, १ दिवस चालणे आणि एक दिवस विश्रांती असा सर्व केला. पाच पैकी २ दिवस रस्त्यावरून धीम्या गतीने पाळणे, २ दिवस अधिक गतीने पळणे आणि दर रविवारी साधारण १५ ते १८ मैल पळणे अशी पद्धत अवलंबली. ३० आठवड्याच्या वेळापत्रकात पहिले १० आठवडे सुमारे ४०-४५ मैल दार आठवड्याला पळण्याचा सराव केला. त्यानांतरचे १० आठवडे हे अंतर वाढवून सहनशक्ती आणि स्टॅमिना वाढवला आणि शेवटचे १० आठवडे दर आठवड्यात ६०-७० मैल पळत होतो. मी रोज पहाटे पावणे पाचला उठून, साधारण ३० मिनिटे स्ट्रेचिंग चे व्यायाम करून सकाळी ६ ते ८ असे दोन तास पळत होतो. वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर हे अवघड नाही.

९. तुम्ही बोस्टन मॅरेथॉन हि 'चॅरिटी' साठी पळालात का?
हो. कॅन्सरने माझ्या आईचा बळी घेतला. वैद्यकीय क्षेत्रात कॅन्सरबाबत बरीच प्रगती झाली असूनही खूप संशोधन बाकी आहे. आज माझा नातू ३ वर्षांचा आहे. मला वाटतं नातवंडं ही आपल्या आनंदाचं अनेकपटींनी वर्धन करतात. शिवाय माझी पत्नी बालरोग चिकित्सक असल्याने मी कॅन्सर पीडित लहान मुलांच्यासाठी काम करणाऱ्या 'जॉन हॅनकॉक फाऊंडेशनची' निवड केली.  

१०. यापुढे तुमचे ध्येय काय? तुमच्यापासून कोणी प्रेरणा घेतली तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
आता पर्यंत मी अमेरिका, युरोप व जपान या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला आता सातही भूखंडात पळण्याचा माझा मानस आहे. पुढीलवर्षी ऑस्टेलियातील सिडने मॅरेथॉन साठी मी प्रयत्नशील आहे.  शिवाय इतर मॅरॅथॉनही आहेतच.  माझ्यापासून कुणाला प्रेरणा मिळत असेल तर मला आनंदच वाटेल. मॅरेथॉन हा मोठा पल्ला आहे. ह्यात घिसाडघाई करून चालणार नाही, उलट शरीराला अपाय होईल. नेहमी आपल्या शरीराचे ऐकून हळूहळू वेग आणि अंतर वाढवत जा. पहिल्यांदाच मॅरेथॉन पळत असाल तर कमीत कमी २० ते ३० आठवडे तयारीसाठी ठेवा. अनेक ट्रेनिंग चार्ट इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्याचा वापर करून तुमच्या प्रगतीचा आलेख पहा.  runners world सारख्या मासिकांचे वर्गणीदार व्हा व अद्ययावत राहा. आवश्यक तेथे डॉक्टरांचा सल्ला घ्या. पळण्याचा आनंद घ्या, आजूबाजूचे निसर्गसॊन्दर्य पहा आणि नवीन शहरात स्पर्धा असेल तर त्या शहराचात चालण्याचा/ते बघण्याचा अनुभव घ्या.  patience is key to everything! पळण्याने सर्वांगीण शक्तीचा विकास होतो. शांत झोप लागते हे अतिरिक्त फायदे आहेतच. 

सतीश  कोल्ढेकरांना धन्यवाद देऊन व त्यांच्या पुढच्या पळापळीसाठी शुभेच्छा देऊन मी काढता पाय घेतला  खरा पण त्यांच्या प्रेरणेने माझेही पाय शिवशिवायला लागले हे नक्की!

तळटीप:  कोल्ढेकरानंतर सहा मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम बोस्टनस्थित, मूळचे महाराष्ट्रीयन दुर्गेश माणकेकर (वय ४२) यांनीही केल्याचे लेखकाच्या ध्यानात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम

पळा पळा कोण पुढे पळे तो..