सुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द
सागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस )
गेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते. ("बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know! त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो! असो)
या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाची कल्पना व नाटिकेतील काव्य स्मिता महाजन यांनी लिहिलेलं होते.
सुकन्या कुलकर्णी हे नाव अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे पण ती नृत्य करते हे अनेकांना माहिती नव्हते. नाटक, चित्रपट यातून पुरेशी प्रसिद्धी मिळालेली असताना, आता वयाच्या पन्नाशीत, शरीराची ठेवणं भरतनाट्यमसारख्या अवघड नृत्य प्रकारासाठी साजेशी नसताना तिने का करावे असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक होते. सुकन्याने श्रोत्यांशी संवाद साधताना ह्याचे उत्तर दिले आणि जी बाजू उलगडून दाखवली ते ऐकून अनेकांनी तिच्या जिद्दीची दाद दिली.
सुकन्याला लहानपणापासून नृत्याची आवड होती. ती प्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे चाफेकर यांच्या कडे भरतनाट्यम शिकत होती. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ योगायोगाने आणि सुलभा देशपांडेच्या प्रोत्साहनाने ती नाट्यक्षेत्रात आली. झुलवा ह्या नाटकानं प्रसिद्धी मिळवून दिली असताना आणि नाट्यक्षेत्रातील करिअर ला नवीन दिशा मिळत असताना घडलेल्या घटनांनी तिच्या जीवनाला कलाटणी दिली. जून १९९० मध्ये जन्मगाठ या नाटकात काम करताना स्वतःला पूर्ण मागे झोकून द्यायच्या सीन मध्ये ती पूर्ण डोक्यावर पडली व तिला समाघात (brain concussion) झाला. त्या वर्षी खरतर डिसेंबर मध्ये अरंगेत्रम करायचं तिनं ठरवलं होत पण ह्या अपघातानं त्यावर पाणी पसरवलं. समाघात झाल्यानं तिला ४-५ दिवस अंधत्व आलं आणि काही दिवस बोलता येत नव्हतं. अर्थातच नृत्य अनेक दिवस बंद झालं. त्यातून उठून परत नाटक/चित्रपट करायला सुरुवात केली. भरतनाट्यम सुरु केलं आणि १९९३ मध्ये अरंगेत्रम करायचं ठरवलं. पण परत त्या वर्षी जून महिन्यात मृत्युंजय मालिकेचा सेट तिच्या अंगावर पडला. ह्या वेळी तिची वाचा पूर्ण गेली आणि जवळ जवळ ६ महिने बोलता आल नाही. तिची उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडली. वास येत नव्हता, पदार्थांची चव कळत नव्हती. नाटकात, टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या कलाकाराची वाचा जाणं म्हणजे संपूर्ण कारकीर्द नष्ट झाल्यात जमा! तशात पक्षाघात पण झालेला असल्याने परावलंबत्व आलं. औषधोपचार आणि स्टेरॉईड यामुळे वजन प्रचंड वाढलं. अर्थात कुणालाही ह्या परिस्थितीत होईल तस प्रचंड नैराश्य येणं स्वाभाविक होतं. ती प्रचंड खचून गेली. गुरू व आई यांनी ह्या सगळयातून तिला धीराने बाहेर काढलं. ‘तू नोकरी कर, सिरियल कर, काहीही कर, पण खचून जायचं नाही’ अशी प्रसंगी सक्त ताकीद तर कधी प्रेमळ समजावणी त्या दरम्यान तिची आई करीत होती.
वर्षभराच्या विश्रांती व उपचारानंतर ती काही प्रमाणात पूर्ववत झाली व नाटकातून काम करू लागली. पण नृत्याची मूळ आवड तिला गप्प बसू देत नव्हती. अर्थात वयानुसार आणि शारीरिक व्याधीमुळे शारीरीक हालचालींवर मर्यादा आली होती. तिने पुण्याला नृत्यांगना स्मिता साठे-महाजन यांच्या कडे परत भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. नाटकाची संहितेवर काम करायची पद्धत वेगळी आणि नृत्याची वेगळी त्यामुळे त्याचाही सुरुवातीला त्रास झाला. त्यामुळे तिच्या गुरु स्मिता महाजन तिला नृत्याच्या 'स्टेप्स' रेकॉर्ड करून देत आणि शूटिंग सोडून उरलेल्या वेळेत त्या पाहून ती सराव करत असे. तिला पूर्ण खाली वाकून पाहताना भोवळ येते, पूर्ण खाली बसून करायच्या स्टेप्स येणार नाहीत ह्याची कल्पना असताना देखील तिने ते पूर्ण केले आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी अरंगेत्रम पूर्ण केले.
सुकन्यांन जेंव्हा हि गोष्ट सांगितली तेंव्हा अनेकांना प्रेरणादायक वाटली. केवळ तिला आनंददायी वाटते म्हणून ती नाचते हे तिन आवर्जून नमूद केलं. आमच्या मंडळात तिने वैजयंती नावाची नृत्यनाटिका सादर केली. हि नृत्य नाटिका लिहिलेल्या स्मिता महाजन यांचे विशेष कौतुक करायला हवे. साधारण भरतनाट्यम मध्ये संस्कृत किंवा तामिळ रचना असतात आणि केवळ नृत्य हे ज्यांना त्या माध्यमाची, पदलालित्यातील बारकाव्यांची जाण आहे अशांनाच आवडू शकते. पण नृत्य नाटिका असल्याने अनेक प्रेक्षकांना त्यातील कथा भावली आणि कार्यक्रम अधिक रंगला.
अनेकदा आपण लहानपणी पाहिलेली स्वप्ने आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. आयुष्यातील अनेक प्रसंगांना तोंड देताना 'जाऊ दे, आता कुठं जमणार आहे?' असा विचार करून त्यांना आपल्याच हातांनी मूठमाती द्यावी लागते. पण शारीरिक व्याधींनी खचून ना जाता एक स्वप्न पूर्ण करायचं म्हणून एखादी गोष्ट शिकणं, आपल्यातील उणीवांची जाणीव असणं आणि तरीही जे जे शक्य आहे ते साध्य करायचा प्रयत्न करणं ही सुकन्याची बाब नक्कीच प्रेरणादायक आहे.