वेडा शांतीदूत
वेडा शांतीदूत
तुम्ही अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को ते वॉशिंग्टन डीसी या भागातील एखाद्या शहरातून जात असाल आणि एखादी ट्रॉली ढकलत या माणसाला पाहिलं तर तुम्हाला तो कदाचित गरीब, बेघर (homeless), भिकारी (begger) आहे असं वाटेल. पण तो शांतपणे पुढं पुढं जाताना दिसेल. तो तुमच्याकडं काही मागणार नाही, हातात एखादा फलक घेऊन मला काहीतरी मदत करा असं सुचवणार देखील नाही! पण तुम्ही थांबलात, त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तो ही पायपीट का करतोय ते कळेल. त्याचं नाव नितीन सोनावणे. तो २०२५ मध्ये सॅन फ्रान्सिस्को पासून वॉशिंग्टन पर्यंत शांतीचा संदेश घेऊन चालत चाललाय. "ह्यानं तो नक्की काय साधणार आहे? काही आहे का याचा उपयोग?" "वेडपट आहे झालं" असं म्हणणारे अनेक त्याला भेटले आहेत. एका अर्थानं तो वेडा आहे पण हे चांगलं वेड आहे. शेवटी कोवळ्या वयात जीव देणारा भगतसिंगही वेडा होता आणि मूठभर मीठ उचलण्यासाठी पायपीट करणारे गांधीही. अर्थात मला त्याला या महान लोकांच्या रांगेत बसवायचं नाहीये. तो एवढा महान अजिबात नाहीये. तो आपल्यासारखाच अगदी सर्वसामान्य माणूस आहे - पण त्याला हे शांतीसंदेश पोहोचवण्याचं व त्यासाठी पायपीट करायचं वेड लागलंय हे नक्की.
त्याच्याशी बोललो तेंव्हा जाणवलं की शांतीसंदेश देताना तो स्वतःचंही मानसिक शुद्धीकरण करतो आहे. हे त्याचं अविरत चालणं एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. माणसं मुळात चांगली असतात, फक्त कुठल्यातरी विचारांच्या भावनेच्या आहारी जाऊन भरकटतात, स्वतःभोवती आभासी कुंपणं/भिंती घालून घेतात आणि एकमेकांपासून दुरावतात ह्यावर त्याचा विश्वास आहे. ह्या भटकंतीतून ही कुंपणं, आपणच निर्माण केलेल्या भिंती किती कुचकामी आहेत, त्या आपल्याला कसं निरानंद करत आहेत हे जाणवून देतो आहे. तो कुठलं भाषण करत नाही, उगाचच उपदेश करत नाही. पण त्याच्या ह्या इच्छाशक्तीकडं बघून काही जणांना प्रेरणा मिळते आहे - लोक स्वतःहून कुतूहलानं त्याला विचारत आहेत.
ह्यातून काय साधशील असा प्रश्न कुणीतरी त्याला विचारला? आपण अमुक मिळणार असेल तर तमुक करू असा विचार करणारी माणसं! त्यामुळं आपले विचार देखील अगदी transactional! नितीन असा विचार करतच नाही. त्याची लहानपणापासूनची मानसिक जडणघडण ऐकली की ते लक्षात येतं. मला ती फुलपाखराची गोष्ट आठवली. फुलपाखरू फक्त एका फुलाकडून दुसरीकडं जात असतं - आणि जाताजाता ते परागीभवन करतं - आपण हे करतो आहे ह्याची त्याला कल्पनाही नसते! नितीन अशीच पायपीट करतो आहे - काही लोकांना त्याच कौतुक वाटत, काही लोकांना बावळटपणा! त्याच त्याला काही घेणंदेणं नाही! त्याच आपलं 'एकला चलो रे' सुरु आहे. शिवाय 'कारावा बन गया' वगैरेही काही त्याला करायचं नाहीये. कुठलीच movement करण्यासाठी तो हे करत नाहीये. पण जगात जी हिंसा सुरु आहे, देश वेगवेगळ्या राजनैतिक भूमिकेने कसे विभंगले जात आहेत (polarized होत आहेत) त्या पार्श्वभूमीवर हा संदेश सगळीकडं पोहोचणं हे मला महत्वाचं वाटतं. सहज बोलताना मी त्याला जे कृष्णमूर्तीबद्दल सांगितलं, त्यांचं लिखाण वाच असा सल्लाही दिला. कारण मनुष्यप्राणी म्हणून, humanity म्हणून आपण कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत ह्यावरचं त्यांचं भाष्य ह्या संदेशासारखंच आहे.
त्याच्याबरोबर आम्ही (मी आणि सुधीर) एक मैलभर चाललो, आठवण म्हणून काही फोटो काढले, संपर्कात राहा असं सांगून निरोप दिला. त्याची ट्रॉली घेऊन नितीन चालत झाला. मी आणि सुधीर परत येताना बोललो. त्याची ही पायपीट कमीतकमी काही जणांना प्रेरणा देते, विचार करायला भाग पाडते हेही काही कमी नाही असं आम्हा दोघांना वाटलं.
तुम्हाला कुठं हा ' वेडा शांतीदूत' दिसला तर थांबून दोन शब्द त्याच्याशी जरूर बोला, संवाद साधा.
सुधीरने अगदी impromptu काढलेला हा विडिओ