पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम


पुलजन्मशताब्दी निमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ/अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रमाचा आढावा

सागर साबडे
सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ
 secretary@mmla.org

(A shorter version of this is in BMM June 19 newsletter )

पु ल देशपांडे - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.  गेल्या शतकात अनेकांगांनी ज्यांनी आपलं सांस्कृतिक आयुष्य समृद्ध केलं 
आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांच्या कलावैविध्यतेवर मनस्वी प्रेम केलं त्यांची यावर्षी जन्मशताब्दी!  काही जणांनी 
त्यांना सांस्कृतिक दैवत असंही म्हटलंय (अर्थात हे असं देवत्वपण पुलंना रुचलं नसतं हा भाग वेगळा!).

(caricature: S D Phadnis)

पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम करावा असं लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या समितीला वाटत होत 
पण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं.  तितक्यात लॉस एंजेलिस स्थित 'अभिव्यक्ती ग्रुप' ने त्यांना असा कार्यक्रम 
करायला आवडेल असा प्रस्ताव पाठवला. अभिव्यक्ती ग्रुप म्हणजे इथला थिएटरशी संबंधी हौशी कलाकारांचा समूह.  
गेले १०-१२ वर्षे ते वेगवेगळी नाटके बसवत आहेत -- काही नावाजलेली, काही स्वतः लिहिलेली! वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्या 
ह्या प्रायोगिकतेचे कौतुकही झाले आहे. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी abhivyakti.org ला भेट द्यावी.) त्या ग्रुपचे आणि 
मंडळाचे विशेष संबंध पहिल्यापासून असल्याने मंडळाच्या कार्यक्रमात अभिव्यक्तीमधील कलाकारांनी आपली कला
 सादर केली होती. त्यामुळे त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल विश्वास होताच. त्यामुळे त्यांच्या ह्या प्रस्तावाला आम्ही आनंदाने 
अनुमोदन दिले.  ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाच्या समितीतील आम्ही काहीजण पण त्यांच्या ग्रुपबरोबर जोडले 
गेलो.

गेले २-३ महिने पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आम्ही सारेच नारायणाच्या भूमिकेत शिरलो होतो. 
त्यांच्यावर व त्यांनी लिहिलेले जेवढे वाचता येणे शक्य होते तेवढे वाचत होतो, ऐकत होतो.  एवढे लोकं 'नोटा' देऊन
 येणार तर कार्यक्रम जरातरी "नोटेबल" व्हायला हवा याचं थोडं टेन्शन होतंच . (ह्या असल्या कोट्या सुचणं हा पण पुलंच्या
 इतक्या महिन्याच्या सतत संगतीचा परिणाम! शेवटी परिसस्पर्शच तो !)  शिवाय ऐन कार्यक्रमाच्या वेळी एखादे  
रावसाहेबासारखे  निघाले तर काय अशीही थोडी धास्ती होती!

पुलंच्या वाचनात गढून गेल्याने विहार व व्यायाम नैमित्तिक झाला आणि आहार मात्र तसाच राहिला.  वजनकाट्याने 
हळू हळू उत्तरेकडे सरकायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच घरून उपदेश येऊ लागले मग मी पण त्याला आमच्या 
दृष्टीच्या कक्षेबाहेर करून त्याचा काटा काढला!

(caricature: Soham Kadwaikar)

पुलंचं साहित्य वाचताना, पाहताना एक गोष्ट जाणवली कि एकदा वाचलेली गोष्ट परत वाचली तरी नव्याने आनंद देते, 
कधी कधी पूर्वी लक्षात न आलेले पैलू लक्षात येतात.  एका अर्थाने हा कार्यक्रम हि सुद्धा सगळी पुनरावृत्तीच होती. पण 
चंदन जसं कितीही उगाळलं तरी त्यातून येणारा सुगंध कमी होत नाही तसं पुलंच्या लिखाणातला गोडवा तसाच टिकून आहे
 हे जाणवलं.  भले चाळी आता कमी झाल्या असतील, पण पुलंनी बरोबर लिखाणात पकडलेला माणसातली वैशिष्ठये तशीच
 आहेत. म्हणूनच ती आपल्याला अजूनही भावतात! तसेच काही वेळा काही गोष्टी नव्याने लक्षात येतात.
शेवटी हे पुलंच्या (दैवी?) लेखणीतून उतरलेलं लिखाण.. ते सादर करताना आमची भावना तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे ' 
फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही' हीच होती.

ह्या आगळ्या वेगळ्या आनंदयात्री बद्दल खूप काही वाचताना आमचं सर्वांचं आयुष्य समृद्ध झालं, पुलकित झालं.  मी 
व्यक्तिशः इतका पुलमय झालो कि हा कार्यक्रम पाहायला भाई स्वतः असायला हवे होते असं वाटून गेलं!  अर्थात त्यांचेच 
शब्द उधार घेऊन सांगायचं तर.. आपलं आयुष्य समृद्ध करायला देवाने ह्या माणसाला पाठवलं आणि परत नेलं.  पण 
आज जर का भाई असते तर त्यांच्या स्वाभाविक विनयशील स्वभावाला अनुसरून, थरथरत्या आवाजात असचं काहीतरी 
बोलले असते:

"खरं सांगू का तुम्ही हे जन्मशताब्दी वगैरे साजरी करावी एवढा मी काही फार मोठा लेखक नाही..  मला जीवनात जी
 विसंगती दिसली, त्यातून मी आनंद शोधायचा प्रयत्न केला आणि तो इतरांबरोबर वाटला एवढंच!.  तो काही जणांना 
आवडला, काही जणांनी नाक मुरडली.. व्यक्ती व्यक्ती मतेर्भिन्ना ! असो.


आता तुम्ही सगळी शिकलेली, आपापल्या क्षेत्रात पारंगत मंडळी.  तरीही कोणीतरी माझ्या पुस्तकातली एखादी ओळ 
कुठेतरी मांडतो, कुणी काय ते फेसबुक का काय त्यावर लिहितो.  कुणी ते व्हाट्सअँप वरआलंय म्हणून मला दाखवायला, 
सांगायला येतो.. खूप छान वाटत. आता कधीकधी तुकारामबुवांच्या पासून आमच्या लेखक मित्रांपर्यंत कुणाच्याही ओळी 
माझ्या नावावर खपवल्या जातात तेंव्हा मात्र वाईट वाटत ..काळाच्या ओघात भल्याभल्यांचा विसर होतो.  पण संपर्कसाधनाचा
 सुकाळ झालेल्या काळातही माझ्या दोन चार ओळी अजूनही टिकून आहेत, भोंडल्याच्या खिरापतीसारख्या वाटल्या जात 
आहेत आणि कुणाला काही क्षण का होईना आनंद देतायेत हे पाहून मला खूप समाधान वाटत. गतजन्मी मी काहीतरी 
पुण्याई केली असणार म्हणून हे भाग्य मला लाभलं !


संदेश वगैरे द्यायला मी काही कोणी मोठा माणूस  नाही पण जाताजाता मला उमगलेलं एकच गुज सांगतो.. जीवनात 
आनंद आहे असं  म्हटलं ना तरच आनंद दिसतो. तो कोणी तुम्हाला दिला, दाखवला तर तो द्विगुणीत करायला शिका 
आणि जर तुम्हाला दिसला, मिळाला  तर तो फक्त तुमच्याजवळ न ठेवता वाटून टाका. तुम्ही जेवढा तो वाटाल ना तेवढा
 तो चक्रवाढ पद्धतीने अधिकप्रमाणात वाढून परत तुम्हाला मिळेल. ( शाळेत असताना गणिताचा आणि माझा ३६ चाच 
एकदा होता पण हि चक्रवाढ पद्धत मात्र मला आयुष्यात खूप वेळा अनुभवता आली!) एकदा का हि सोंदर्यदृष्टी तुम्हाला 
मिळाली कि जगण्यात जी मजा येईल ना ती सांगून नाही कळणार... अनुभवावीच लागेल... "


एकंदरीत कार्यक्रम छान झाला.  साधारण १२/१३ वेगवेगळे नाट्यप्रयोग होते. शिवाय पुलंच्या काही अपरिचित पैलूंची 
ओळख करून देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून वेगवेगळ्या ध्वनिफिती, चित्रफिती दाखवल्या. पुढील 
पिढीतल्या काही मुलांना हाताशी घेऊन एक छोटा प्रयोग सादर केला.  पुलं आणि सुनीताबाई सादर करत तसं कवी 
संमेलन करून बोरकर, ग्रेस, आरती प्रभू यांच्या कविता सादर झाल्या. हा प्रयोगही अनेकांना आवडला.

मी "तुमचंच काम छान झालं" असं प्रत्येक पुरुषाला आणि (माझी बायको जवळपास नाही याची खात्री करून) "स्टेजवर 
तुम्हीच सर्वात सुंदर आणि तरुण दिसत होतात" असं प्रत्येक स्त्री कलाकाराला आळीपाळीनं खाजगीत सांगितल!  त्यातल्या 
काही दिलदार पुरुषांनी लगेच "बिअर पार्टी"चं आमंत्रण दिलं आणि बहुतांश बायकांनी मनाने आणखी तरुण झाल्याने
 "तुम्ही पण किती हो काम केलंत .. आता एकदा आमच्याकडं श्रमपरिहाराला यायचं हं" असा लाडिक हट्ट पण केला. 
(आता त्यांची कोमल मन कशी बर मोडणार?)

तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला काही नवीन शोध लागले.. वाचकांच्या माहितीसाठी ते इथे नमूद करत 
आहे:
- फेसबुक व व्हाट्सअँप च्या क्रांतीमुळे एकेकाळी प्रचलित ई-मेल व्यवस्था बारगळली आहे.
- लोक ईमेल वाचत नाहीत याची खात्री झाली
- व्हाट्सअँप सारखी संपर्कसाधने वापरण्याने आपली गणना मिलेनियल्स मध्ये होईल आणि आपण वयाने व मनाने तरुण
 होऊ असा कदाचित त्यामागचा विचार असावा.

या प्रयोगाच्या आयोजनाचा प्रवास रम्य होता. त्याची अपूर्वाई शब्दबद्ध करणं कठीण आहे. काही  
व्यक्ती आणि वल्लीशी स्नेहबंध निर्माण झाले जणू काही ते पूर्वजन्मीचे गणगोत असावेत अशा प्रकारची आपुलकी 
 निर्माण झाली. . अनेकांनी ह्या गोष्टी लहानपणी वाचल्या होत्या त्यामुळे पुन्हा पोरवयात गेल्यासारखं वाटलं. पुलंनीच 
दिलेली हि देणगी -- गाठोडं उघडून तो आनंद वाटून टाकताना, हे चार शब्द लोकांपर्यंत पोहोचवताना स्वानंदाचा शोध 
लागला.. ह्या प्रयत्नाला काही रसिकांची दाद मिळाली आणि आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच असं आम्हाला वाटून गेलं.
 कुठून हि नस्ती उठाठेव केली अशी भावना कदापि मनाला शिवली नाही. . कार्यक्रम संपताना आमची हीच भावना होती..
                                        याच साठी केला होता अट्टाहास
                                        तुका म्हणे आता शेवटचा दिस गोड व्हावा!


पुलंनीच आकाशवाणीवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं होत कि एखादं पुस्तक आपण वाचतो तेंव्हा त्या
 लेखकालाच जणू आपण भेटत असतो. काळाच्या भिंतीसुद्धा लेखकाचं ते बोलणं थोपवू शकत नाहीत.  आता हे पुलंच्याच 
लिखाणाच्या बाबतीत किती चपखल लागू होतंय ह्याचाहि कार्यक्रम करताना पुनःप्रत्यय आला.
(pc: Ashish Mahabal)

पुढील पिढीला सामावून घेण्याचा, पुल लेखक म्हणून आणि माणूस म्हणून किती मोठे होते हे सांगण्याचाही प्रयत्न होता.. 
जेव्हा घरी आलेले एक स्नेही नागपूरचे आहेत कळल्यावर माझा मुलगा "म्हणजे हेच का ते जे तिकडची संत्री किती भारी 
असं सांगत असतात असं पुल म्हणाले?" अस मला विचारता झाला तेंव्हा नकळत का होईना पुलंबद्दलच आमच्या पिढीचं 
प्रेम पुढच्या पिढीत हस्तांतरित झाल्याच पाहून आमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं वाटलं..

 या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व या कार्यक्रमास हातभार लावून भार हलक्या केलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! सर्वांचा ऋणनिर्देश करायचा एक प्रयत्न...  (please click on the link to see all participants names).

कार्यक्रमाची चित्रफीत पाहण्यासाठी हा दुवा वापरावा 

Please click here for photos (thanks to Kedar Deshpande). 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत

पळा पळा कोण पुढे पळे तो..

गदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम